ताज्या घडामोडीसामाजीक

राज ठाकरेंना गडचिरोलीच्या शेतकऱ्यांची आर्त हाक

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि एमआयडीसी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा असंतोष तीव्र होत आहे. बाधित शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेत मनसे नेते राजू उंबरकर यांच्याकडे निवेदने सादर केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः गडचिरोलीत येऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या दोन्ही भूसंपादन प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विमानतळ भूसंपादनाला विरोध

गडचिरोली शहरालगतच्या गुरवळा, हिरापूर, शिरपूर चक आणि राखी परिसरातील सुपीक शेतजमीन प्रस्तावित विमानतळासाठी संपादित करण्याच्या हालचाली सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. याविरोधात शेतकरी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने उपसरपंच दिवाकर निसार यांच्या नेतृत्वाखाली मनसे नेते राजू उंबरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या भागातील अनेक शेतकरी अल्पभूधारक असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हिरापूरलगतचे सुमारे ५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून, हिरापूर गाव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दत्तक घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच गुरवळा परिसरातील नेचर सफारी व वन्यजीव संपत्ती लक्षात घेता हा भाग पर्यावरणीयदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचा दावा करण्यात आला.

यापूर्वीच्या आंदोलनानंतर सहपालकमंत्र्यांनी लेखी स्थगिती दिली असतानाही अधिसूचना रद्द न करता निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सुपीक शेतजमीन संपादित करण्याऐवजी पडीक अथवा शासकीय जमिनीचा पर्याय शोधावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.

१३ गावांचा एमआयडीसी भूसंपादनाला विरोध

दरम्यान, जयरामपूर–येनापूर परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी भूसंपादनालाही १३ गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. या गावांतील प्रमुख प्रतिनिधी व ग्रामस्थांनी एकत्र येत राजू उंबरकर यांच्याकडे निवेदन सादर केले.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी, उपजीविकेची साधने आणि भवितव्य धोक्यात आणून कोणताही निर्णय लादू नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. स्थानिक शेतकऱ्यांची बाजू शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याची मागणीही त्यांनी केली.

‘राज ठाकरेंनी गडचिरोलीत यावे’

दोन्ही प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळाला वेळ देण्यात यावा, तसेच त्यांना गडचिरोली दौऱ्याचे निमंत्रण देऊन प्रत्यक्ष शेतकरी व बाधित परिसराची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली.

“राज ठाकरे यांनी गडचिरोलीत येऊन शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घ्यावी आणि विमानतळ तसेच एमआयडीसी भूसंपादनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मनसेनेही शेतकऱ्यांच्या या लढ्यात शेवटपर्यंत खंबीरपणे साथ देण्याची भूमिका व्यक्त केली.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुलकर, जिल्हा संघटक राजेंद्र गडपल्लीवार, मनविसे जिल्हाध्यक्ष स्वप्निल वाढई, तालुकाध्यक्ष प्रणित श्रीरामवार यांच्यासह मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाधित शेतकरी उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker