आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी
चामोर्शी माता-बाळ मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन

गडचिरोली, प्रतिनिधी :-
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे २७ वर्षीय महिला व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी आणि आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजता जिजा हंसराज सातर (वय २७), रा. चामोर्शी, यांना प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्याने व योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला, तर प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर महिलेला गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचाही मृत्यू झाला.
या घटनेनंतर अमिता मडावी व राज बन्सोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. उपचारात हलगर्जीपणा झाला आहे का, रुग्णाला वेळेत आवश्यक उपचार मिळाले का, रेफर करण्यात विलंब झाला का आणि या घटनेला कोण जबाबदार आहे, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.



