आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार

धानाला बोनस, शेतकरी कर्जमाफी, स्मार्ट मीटर रद्द करण्यासह विविध मागण्या

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. गडचिरोली शहरातील संस्कृती सभागृहात २५ ऑगस्ट रोजी आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात धानाला बोनस, शेतकरी कर्जमाफी, स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करणे, स्थानिकांना रोजगार आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी पत्रकार परिषद मधून देण्यात आला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, अॅड. हिराचंद बोरकुटे, अॅड. संजय ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्जल फारूख यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

धानाला बोनस व शेतकरी कर्जमाफीची मागणी

गडचिरोली हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा असतानाही शेतकऱ्यांना धानाचा बोनस अद्याप मिळालेला नसल्याचा मुद्दा जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण मोठे असल्याने शेतीयोग्य जमीन मर्यादित आहे. अशा परिस्थितीत उद्योगांसाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करण्यास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योग उभारणीसाठी शक्यतो शासकीय जमिनीचा वापर करावा आणि शेतकऱ्यांची जमीन घेतल्यास स्थानिक युवकांना रोजगाराची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफी, धानाला बोनस, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिकांना रोजगार नसेल तर उद्योगांना विरोध

गडचिरोलीत उद्योग उभारले जात असतील, तर स्थानिकांच्या जमिनी घेऊन त्यांना रोजगारापासून वंचित ठेवता येणार नाही. स्थानिकांना रोजगाराची संधी मिळत नसेल तर अशा उद्योगांना राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करेल, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला.

महागाई, ‘लाडकी बहीण’ आणि परीक्षा गैरप्रकारांवर देशमुखांचा निशाणा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महागाई, गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवरून सरकारवर टीका केली. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक पात्र महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली गेल्याचा आरोप करीत प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी त्यांनी केली.

नीट, एमपीएससी, तलाठी तसेच शिक्षक भरतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी किंवा गैरप्रकाराच्या तक्रारी होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे मेहनत करून परीक्षांची तयारी केलेली असते. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखून गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली.

स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करण्याची मागणी

वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरमुळे अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त करीत स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करण्याची मागणी मेळाव्यात करण्यात आली. सामान्य वीज ग्राहकांच्या हिताचा विचार करून शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली.

शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मेळाव्याचे संचालन रजनी पाल यांनी केले. प्रास्ताविक मुरलीधर नागोसे यांनी केले, तर आभार राजू आत्राम यांनी मानले. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker