आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी
अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; १९ जनावरांसह १९.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-
कुरखेडा तालुक्यातील गेवरधा परिसरात अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १९ गोवंशीय जनावरांसह ट्रक व बोलेरो पिकअप अशी दोन वाहने असा एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्टच्या रात्री गेवरधा ते केशोरी मार्गावरून दोन वाहनांमध्ये अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गेवरधा गावाजवळ सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या ट्रक आणि बोलेरो पिकअपला अडवून तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे दाटीवाटीने भरल्याचे आढळून आले.
ट्रक क्रमांक टीजी १२ यू ४८९६ मध्ये ११ गायी व दोन बैल, तर एमएच ३५ एजे ४६०१ या बोलेरो पिकअपमध्ये चार गायी व दोन बैल आढळून आले. या १९ जनावरांची अंदाजे किंमत २ लाख ६५ हजार रुपये आहे. याशिवाय १२ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि पाच लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी ट्रकचालक शेख इब्राहिम शेख इस्माईल (४०) आणि बोलेरो चालक मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी (२५), दोघेही नागपूर येथील रहिवासी, यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज. जी. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे आणि कुरखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



