आपला जिल्हाताज्या घडामोडी
टिपागड येथे ‘ट्रेक विथ आमदार’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पावसाची तमा न बाळगता युवक, पर्यटक व निसर्गप्रेमींचा सहभाग

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम पर्यटनस्थळांना व्यापक ओळख मिळवून देण्यासोबतच निसर्गसंपदा, आदिवासी संस्कृती आणि साहसी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या संकल्पनेतून टिपागड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘Trek With MLA’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील युवक, पर्यटक, ट्रेकर्स, बाईक रायडर्स, ज्येष्ठ नागरिक आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
भाजपा युवा मोर्चा, गडचिरोली आणि Sobay Tourism LLP (TRIBee Tours) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुसळधार पाऊस, अवघड चढाई आणि प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता सहभागी बाईक राईड करत टिपागड येथे पोहोचले. त्यानंतर ट्रेकला सुरुवात करण्यात आली. पावसातही सहभागींचा उत्साह कायम राहिल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

टिपागड हे केवळ निसर्गरम्य ठिकाण नसून आदिवासी समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेले महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे येथील धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वासोबतच साहसी पर्यटनाची क्षमता राज्य आणि देशाच्या पर्यटन नकाशावर आणण्याची गरज आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
गडचिरोलीतील पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच स्थानिक आदिवासी संस्कृती आणि परंपरांनाही व्यापक व्यासपीठ मिळू शकते. या उद्देशाने लोकसहभागातून पर्यटनविषयक उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानस आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, ज्येष्ठ नेते विजय कुमरे, महिला आघाडी जिल्हा महामंत्री लताताई पुंगाटे, गडचिरोली को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक गजानन साळवे, जिल्हा सचिव सारंग साळवे यांच्यासह भाजप व भाजयुमोचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवक, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आभार मानले. ‘Trek With MLA’ उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोलीतील अन्य दुर्गम पर्यटनस्थळांनाही प्रसिद्धी देऊन भविष्यात अशा उपक्रमांचे व्यापक आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



