आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना वेळेत खते, बियाणे व कृषी साहित्य उपलब्ध करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे

गडचिरोली, प्रतिनिधी :-

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक खते, बियाणे, कीटकनाशके व इतर कृषी साहित्याचा सुरळीत आणि तातडीने पुरवठा करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दिला.

यासंदर्भात ॲड. कोवासे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरवळकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध कृषी समस्यांवर सविस्तर चर्चा केली. खरीप हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला खते, बियाणे किंवा इतर कृषी साहित्याच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी कृषी विभागाने प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवर आवश्यक कृषी साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, तसेच कृषी केंद्र चालक आणि शेतकरी यांच्यात योग्य समन्वय साधून वितरण प्रक्रिया सुलभ करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. सध्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना खते व बियाणे मिळविण्यासाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी बोलताना ॲड. विश्वजीत कोवासे म्हणाले, “खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कृषी साहित्याच्या पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

या भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विवेक घोंगडे, हेमंत मोहितकर आणि विलास ठाकरे उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker