आपला जिल्हाताज्या घडामोडी
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची पीडित कुटुंबाला भेट
हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरालगतच्या बोदली-मेंढा येथील धनराज मनिराम मडावी (वय ३५) या शेतकऱ्याचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि वनविभागाला तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास धनराज मडावी हे शेतीसाठी खत आणण्याच्या कामानिमित्त बाहेर गेले असताना परिसरात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. हत्तीने त्यांचा पाठलाग करून सोंडेने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच डॉ. अशोक नेते यांनी बोदली-मेंढा येथे जाऊन मडावी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत वैयक्तिक स्तरावर आर्थिक मदत दिली. यावेळी त्यांनी, “मडावी कुटुंबावर कोसळलेला हा आघात अत्यंत वेदनादायी असून या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे सांगितले.
यानंतर डॉ. नेते यांनी हत्तीच्या कळपाने केलेल्या शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे तसेच स्थानिक धान्य व्यापारी दिलीप बुरले यांच्या गोदामाचे शटर तोडून आत ठेवलेल्या धान्याची व गोदामाची मोठी नासधूस झाल्याचे त्यांनी पाहिले.




