आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय
घटनेची सखोल चौकशी व कारवाईची मागणी

सोनापूर (ता. चामोर्शी), प्रतिनिधी :
सोनापूर येथील राजीव गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या घटनेत सहा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात पाणी प्यायल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक डोकेदुखी, चक्कर येणे आणि अस्वस्थता जाणवू लागली. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर वाटल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार आणि जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व युवा जिल्हाध्यक्ष विकी खोब्रागडे यांनीही जिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी, त्यांच्या पालकांशी तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती राज बन्सोड यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, “महाविद्यालयात पाणी पिल्यानंतर डोके दुखू लागले, चक्कर आली आणि आम्ही खाली पडलो.” या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आजाद समाज पार्टीने या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, संबंधित संस्थेच्या परिसरातील स्वच्छतेचा अभाव तसेच पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता न झाल्यामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून संबंधित जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निष्काळजीपणा करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, विषबाधेचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसून, वैद्यकीय तपासणी व संबंधित विभागांच्या चौकशी अहवालानंतरच याबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, स्वच्छता व्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधांची विशेष तपासणी करण्याची मागणीही पुढे करण्यात आली आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



