आपला जिल्हाताज्या घडामोडी

चामोर्शी नवीन बसस्थानक तातडीने सुरू करा; अन्यथा जनतेच्या हस्ते लोकार्पण करू – शिवसेना

आमदारांना उद्घाटनासाठी वेळ नाही, चामोर्शी नवीन बसस्थानक शिवसेनेचा प्रशासनाला ७ दिवसांचा इशारा

चामोर्शी, प्रतिनिधी :-

चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) नवीन बसस्थानक सर्व सुविधा व आवश्यक बांधकामासह पूर्ण होऊन तब्बल दोन महिने उलटले असतानाही ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम देत, बसस्थानक सुरू न झाल्यास जनतेच्या हस्ते लोकार्पण करण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवन राघो गेडाम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानक सुरू करण्यासाठी कोणताही तांत्रिक अडथळा नसताना केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले आहे. परिणामी आजही प्रवाशांना भर पावसात तसेच उन्हात रस्त्याच्या कडेला उभे राहून एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पवन गेडाम यांनी चामोर्शी येथे जाऊन नव्या बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान बसस्थानक वापरासाठी पूर्णपणे तयार असूनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पवन गेडाम यांनी प्रशासन आणि स्थानिक आमदारांवर टीका करत म्हटले की, “जनतेच्या सुविधांवर राजकारण करणे थांबवा. स्थानिक आमदारांना उद्घाटनासाठी वेळ नसेल, तर येत्या सात दिवसांत शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि जनतेच्या उपस्थितीत या बसस्थानकाचे लोकार्पण करेल. त्यानंतर एकही एसटी बस जुन्या ठिकाणी उभी राहू दिली जाणार नाही. गरज पडल्यास चक्काजाम आंदोलनही करण्यात येईल.”

जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेली सार्वजनिक सुविधा तातडीने जनतेच्या सेवेत उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शिवसेना जनआंदोलन उभारेल आणि त्यास प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker