आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
गडचिरोलीत ५ जुलै रोजी ० ते १८ वर्षांतील मुलांसाठी मोफत 2D Echo व हृदय तपासणी शिबिर

गडचिरोली, प्रतिनिधी :-
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ५ जुलै २०२६ रोजी ० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत 2D Echo व हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गरजू बालकांना आवश्यकतेनुसार हृदय शस्त्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरात ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथील प्रख्यात बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशुतोष सिंह हे उपस्थित राहून बालरुग्णांची तपासणी करणार आहेत. आवश्यकतेनुसार 2D Echo चाचणी, पुढील उपचार तसेच हृदय शस्त्रक्रियेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच आरोग्यदूत फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश चिवट यांनी जिल्ह्यातील पालकांना आवाहन करताना सांगितले की, बालहृदयरोगाचे वेळेत निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. त्यामुळे मुलांना लवकर थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, वजन न वाढणे, ओठ किंवा नखे निळसर दिसणे अशी लक्षणे आढळल्यास या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.
ते पुढे म्हणाले की, अनेक पालक आर्थिक अडचणीमुळे मुलांची हृदय तपासणी करू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांची मोफत तपासणी करून घ्यावी.
शिबिराचा तपशील :-
दिनांक :- रविवार, ५ जुलै २०२६
वेळ :- सकाळी ८.०० ते दुपारी ३.००
स्थळ :- जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली



