आपला जिल्हाताज्या घडामोडी

प्रमा’ कथित ४ कोटी घोटाळ्याची SIT मार्फत निष्पक्ष चौकशी करा:-आजाद समाज पार्टी

जिल्हाधिकारी व खणीकर्म अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा.

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील DMF (जिल्हा खनिज प्रतिष्ठान) अंतर्गत ‘प्रमा’शी संबंधित कथित ४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची विशेष तपास पथक (SIT) मार्फत निष्पक्ष, वेळबद्ध आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशीच्या कालावधीत जिल्हाधिकारी आणि जिल्हा खणीकर्म अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी आजाद समाज पार्टीने शासनाकडे केली आहे. ही माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज बन्सोड म्हणाले की, जिल्हा खणीकर्म विभाग यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिला आहे. कथित खोट्या स्वाक्षऱ्या आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे ‘प्रमा’ प्रकरण समोर आल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचे व्यवहार यापूर्वीही झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात केवळ एका व्यक्तीवर कारवाई करून चौकशी मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रशासकीय साखळी आणि संभाव्य राजकीय संबंधांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आशिष पिपरे यांचे विविध राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा असून त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत, तर ते स्वतः काँग्रेस गटातून स्वीकृत नगरसेवक असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच या प्रकरणावर प्रमुख राजकीय पक्षांकडून ठोस भूमिका समोर आली नसल्याने जनतेमध्ये शंका निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून तपास सुरू असतानाही इतर संभाव्य जबाबदार व्यक्तींची नावे समोर न आल्याने पोलीस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे बन्सोड यांनी सांगितले. जनतेच्या पैशाशी संबंधित प्रकरणात कोणालाही राजकीय संरक्षण मिळू नये आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात खनिकर्म महासंचालक, नागपूर यांना निवेदन पाठविण्यात आले असून मंगळवारी प्रत्यक्ष भेट घेऊनही पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, निष्पक्ष चौकशी झाली नाही किंवा तपास दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आजाद समाज पार्टी जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला.

पत्रकार परिषदेला आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रदेश सचिव (विदर्भ) धर्मानंद मेश्राम, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, जिल्हा सचिव सुरेंद्र वासनिक, युवा तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे, प्रतीक डांगे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker