गडचिरोलीला अखेर केंद्रीय विद्यालयाची मंजुरी
शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून होणार सुरुवात

उदय धकाते,
गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून, केंद्रीय विद्यालय संघटन (KVS), नवी दिल्ली यांनी गडचिरोली येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील कार्यालयीन आदेश २ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनेने मार्च २०१९ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ५० नवीन केंद्रीय विद्यालयांपैकी गडचिरोली येथील विद्यालय सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. आवश्यक जमीन हस्तांतरण व तात्पुरत्या इमारतीची उपलब्धता पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून विद्यालय सुरू होणार आहे.
प्रारंभी हे विद्यालय गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम विद्यालय, सेमाना बायपास रोड, आनंदनगर येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक वर्गाचा एक तुकडीसह प्रवेश दिला जाणार असून, पुढील काळात आवश्यक मंजुरीनंतर उच्च वर्गांची वाढ करण्यात येणार आहे.
विद्यालयातील प्रवेश प्रक्रिया, तसेच इतर प्रशासकीय औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, सीबीएसई अभ्यासक्रम आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, या निर्णयाचे जिल्हाभर स्वागत होत आहे.




