आपला जिल्हाताज्या घडामोडी

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात काँग्रेसचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

चामोर्शी, प्रतिनिधी :-

स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढती वीजबिले कमी करावीत तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांवरील अन्याय थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस आणि NSUI यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी येथील महावितरण वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वाढत्या वीजबिलांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लादण्याचा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे म्हणाले, “स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाढती वीजबिले आणि महावितरणच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल.”

मोर्चामध्ये माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सातपुते सर, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विलास चीचघरे, विजय लाड, प्रेमानंद कोवासे, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, अमर मोगरे, तेजस कोंडेकर, सुभाष कोठारे, आचल चलकलवार, ओमप्रकाश चौधरी, नेहा आभारे, संजय बुरांडे, पीपलदास सोयाम, जावेद खान यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि वीज ग्राहक सहभागी झाले होते.

मोर्चानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता देवगडे यांना निवेदन सादर केले. यामध्ये स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, वाढती व चुकीची वीजबिले कमी करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी उपकार्यकारी अभियंता देवगडे यांनी निवेदन स्वीकारून सर्व मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील तसेच त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker