आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश
देसाईगंज उपविभागातील ३०० कोटीच्या रेती उत्खननप्रकरणी ईडीकडे तक्रार;
३०० कोटींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशीची मागणी

गडचिरोली,प्रतिनिधी:-
देसाईगंज उपविभागातील रेतीघाटांच्या कंत्राटाच्या आडून विहित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रेती उत्खनन करून सुमारे ३०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप करीत, या व्यवहारांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी-भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी ईडीच्या पश्चिम क्षेत्रीय विशेष संचालकांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
जराते यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जिल्ह्यातील देसाईगंज उपविभागातील आमगाव, कुरुड, चोप, शंकरपूर, रामपूर चक, वैरागड, वघाळा, अरसोडा आणि मोहझरी येथील रेतीघाटांवर ९ मे २०२६ रोजीच्या आदेशान्वये मे. ए.बी. कॅरियर्स डायनॅमिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २१.३५ हेक्टर क्षेत्रातून ९८ हजार ९४० ब्रास रेती उपसा व वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सहा लाख ब्रासपेक्षा अधिक रेतीचे उत्खनन करून त्याची नागपूर, अमरावती, यवतमाळ आदी भागात वाहतूक व विक्री करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, या कामासाठी मोठ्या प्रमाणावर जेसीबी, पोकलेन व इतर यंत्रसामग्रीचा वापर करून दिवस-रात्र नियमबाह्य उत्खनन करण्यात आले. या प्रकाराला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतरही संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराची पाठराखण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात ४ जून रोजी विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात राज्यातील एका वरिष्ठ मंत्र्याचा सहभाग असल्यामुळे शासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावाही जराते यांनी तक्रारीत केला आहे.
एकट्या वघाळा रेतीघाटावरूनच सुमारे दीड लाख ब्रास रेतीचे उत्खनन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या कामादरम्यान एका मजुराचा वाहनाखाली दबून मृत्यू झाल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. या कथित अनियमिततेमुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली असून शासनाला किमान ३०० कोटी रुपयांचा महसुली फटका बसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.



