आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

जिल्हा परिषदेच्या नावाने शिपाईपदाचे आदेश, प्रशासन सतर्क

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्हा परिषदेतील परिचर (शिपाई) भरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता जिल्हा परिषदेच्या नावाने थेट शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली असून, नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्ये मासिक २२ हजार रुपये मानधनावर भरती होणार असल्याची बनावट जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने ती जाहिरात पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, ही घटना शांत होत नाही तोच आता आणखी गंभीर प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात एका उमेदवाराला जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि कथित निवड समितीच्या नावाने कंत्राटी परिचर (शिपाई) पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या बनावट नियुक्तीपत्रात जिल्हा परिषदेचे अधिकृत लेटरहेड, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांचे शिक्के आणि स्वाक्षऱ्यांची हुबेहूब नक्कल करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित उमेदवाराला विशिष्ट तारखेला सेवेत रुजू होण्याचे निर्देशही या आदेशात देण्यात आल्याने फसवणुकीचा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी संबंधित नियुक्तीपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेमार्फत सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, बनावट कागदपत्रे तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही भरतीच्या जाहिराती, नियुक्तीपत्रे किंवा पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. भरतीसंदर्भातील माहिती केवळ जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत कार्यालयातूनच पडताळून पाहावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker