गडचिरोली, प्रतिनिधी :-
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत 2D Echo व हृदय तपासणी शिबिराला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या बाबत आज शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली.
शिबिरात एकूण ३१४ बालरुग्णांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २१० बालकांची 2D Echo तपासणी करण्यात आली. तपासणीत ६२ बालकांना विविध प्रकारचे हृदयरोग असल्याचे निदान झाले. त्यापैकी ५२ बालकांवर तातडीने उपचार करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
विशेष म्हणजे, १० बालरुग्णांची प्रकृती अत्यंत संवेदनशील असल्याचे आढळून आले. या बालकांना पुढील सखोल तपासणीसाठी ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे पाठविण्यात येणार असून, तेथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आवश्यक हृदय शस्त्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
या सर्व निवड झालेल्या बालरुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया, आवश्यक उपचार आणि औषधोपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार असल्याचेही त्यानी नमूद केले.
शिबिरात ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथील प्रख्यात बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशुतोष सिंह यांनी बालरुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. बालहृदयरोगाचे वेळेत निदान झाल्यास यशस्वी उपचार शक्य असल्याने अशा शिबिरांचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्यदूत फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश चिवट यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र शासन, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि पालकांचे आभार मानले. भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे गरजू बालकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषद ला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप ठाकरे,जेष्ठ शिवसेना नेते हेमंत जंबेवार, जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, दीपक भारसाकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button