गडचिरोली, प्रतिनिधी :-
गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय गडचिरोली येथे तातडीने स्थापन करावे, अन्यथा विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २१८ संलग्न महाविद्यालयांचा प्रशासकीय कारभार या विद्यापीठामार्फत चालविला जात आहे. मात्र, सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय अद्याप नागपूर येथेच कार्यरत असल्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना विविध प्रशासकीय कामांसाठी वारंवार नागपूरला जावे लागते. त्यामुळे वेळ, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ज्या धर्तीवर सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय सुरू केले आहे, त्याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे असल्यामुळे संबंधित कार्यालयही गडचिरोलीतच स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यापीठाशी संबंधित सर्व शैक्षणिक व प्रशासकीय कामे गडचिरोलीत होत असताना केवळ सहसंचालक कार्यालयासाठी नागपूरला जावे लागणे ही मोठी विसंगती असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ परिसरात अथवा गडचिरोली शहरात सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक रमेश चौधरी, गटनेते नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे तसेच परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button