अपघातआपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली नजीक हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न जीवावर बेतला

चांदाळा जंगलात तस्कर हत्तीच्या हल्ल्यात इसम ठार

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरालगत असलेल्या चांदळा जंगल परिसरात तस्कर हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका इसमाच्या जीवावर बेतला. हत्तीने अचानक केलेल्या हल्ल्यात धनराज पुंजीराम मडावी (रा. मेंढा, चांदळा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अनेक नागरिकांच्या समोर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तस्कर हत्ती परिसरात दिसत असताना अनेक नागरिक त्याला पाहण्यासाठी तसेच मोबाईलवर फोटो व सेल्फी काढण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले होते. याच दरम्यान धनराज मडावी यांनी हत्तीच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हत्तीने अचानक हल्ला चढवून त्यांना ठार केले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली.

वन विभागाने सांगितले की, रानटी हत्ती किंवा इतर वन्यप्राण्यांच्या जवळ जाऊन फोटो किंवा सेल्फी काढू नये, अशा सूचना वारंवार देण्यात येतात. मात्र, अनेक नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. वन विभागाने पुन्हा एकदा नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे, वन्यप्राण्यांना कोणत्याही परिस्थितीत चिथावणी न देण्याचे आणि सेल्फी काढण्याचा मोह टाळण्याचे आवाहन केले आहे.

वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker