आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन, गडचिरोली येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती निश्चित करण्यात येणार आहे.

मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शेतमजूर, महिला, भूमिहीन, बेरोजगार युवक-युवतींसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच रोजगार निर्मिती आणि विकासाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या मेळाव्याचे प्रमुख आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाशी निष्ठा असलेल्या नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून देणे तसेच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार असून, पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्या विचारांना बळ देत गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या मेळाव्यास पक्षाचे माजी मंत्री, माजी आमदार, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, जिल्हा व तालुका स्तरावरील नेते तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker