आपला जिल्हाताज्या घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेसचा गडचिरोलीत शक्तीप्रदर्शन मेळावा; संघटन विस्तारावर डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा भर

गडचिरोली, प्रतिनिधी :-
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा जिल्हास्तरीय भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा गडचिरोली येथे उत्साहात पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.
मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून पक्षाची मुळे अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे कार्यकर्तेच पक्षाला यश मिळवून देऊ शकतात, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. आत्राम यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, गडचिरोली जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. आगामी काळातही कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी याच जिद्दीने काम सुरू ठेवावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकांच्या तयारीसाठी प्रत्येक बूथवर सक्षम संघटना उभी करण्यावर भर देत डॉ. आत्राम यांनी कार्यकर्त्यांना बूथनिहाय नियोजन, घराघरात संपर्क आणि शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. सोशल मीडियासह प्रत्यक्ष जनसंपर्कावरही लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
राजकारणात यश-अपयश येत असते, मात्र त्यातून न खचता अधिक जोमाने काम करणारे कार्यकर्तेच पक्षाला पुढे नेतात, असे सांगत त्यांनी विकासकामांच्या बळावर जनतेचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केले.



