आपला जिल्हाताज्या घडामोडी

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर; डॉ. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक

गडचिरोली, प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गडचिरोली आगार व विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि सेवा शक्ती संघर्ष युनियन संघ, गडचिरोली मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर्मचारी कल्याण, प्रवासी सुविधा आणि दुर्गम भागातील बससेवा अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला जिल्हा महामंत्री तथा विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश गेडाम, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, भाजप महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. चंदाताई कोडवते, विभागीय नियंत्रक वडस्कर, आगार व्यवस्थापक सचिन नेवारे, सुरक्षा अधिकारी लोखंडे, विभागीय सचिव नवनाथ घायाळ, उपाध्यक्ष बंडूजी पत्तीवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, चालक-वाहक, कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. चालक-वाहकांचा रजा कोटा पूर्ववत वाढविणे, प्रलंबित वैद्यकीय रजा मंजूर करणे, ई-तिकीट (ETIM) मशीनमधील तांत्रिक अडचणी दूर करणे, बसेसच्या तांत्रिक बिघाडासाठी चालकांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई थांबविणे, कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच अहेरी आगारातील नक्षलपीडित कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणे आदी मागण्या करण्यात आल्या.

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत डॉ. नेते यांनी नवेगाव (मुरखळा) येथे घडलेल्या एसटी अपघाताचा संदर्भ देत अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक बसची नियमित तांत्रिक तपासणी, जुन्या बसेसची टप्प्याटप्प्याने बदली आणि सुरक्षित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.दुर्गम व आदिवासी भागातील बंद बसफेऱ्या पुन्हा सुरू करणे, विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर व सुरक्षित सेवा उपलब्ध करून देणे, तसेच बसस्थानकांवर स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि प्रवासी निवारा यांसारख्या मूलभूत सुविधा विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला. मार्कंडा देव, मुतनूर यांसारख्या धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी नियमित बससेवा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

बैठकीत विभागीय नियंत्रक वडस्कर आणि आगार व्यवस्थापक सचिन नेवारे यांनी सर्व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेत नियमानुसार आणि कालबद्ध पद्धतीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अशोक नेते म्हणाले, “एसटीचा खरा आधार म्हणजे प्रामाणिक कर्मचारी आणि सामान्य प्रवासी. कामगारांवर अन्याय होऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रशासनाने सर्व रास्त मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून एसटी सेवा अधिक सुरक्षित, सक्षम आणि जनाभिमुख करावी.”

ही बैठक एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरली असून, प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker