आपला जिल्हा
गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर
गडचिरोली जिल्हा परिषद आणि वेदांत ग्रुप यांच्यात सामंजस्य करार

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्यात ई-लर्निंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे.
या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण सहाय्य दिले जाईल. तर दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योजकता जनजागृती कार्यक्रम राबविले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम गडचिरोलीत राबविण्यात येत आहे.
हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद गडचिरोली व वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे आणि नंद घरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला आहे.
या करारा अंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधा देऊन त्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर केले जाईल. या प्रकल्पानुसार ‘नंदघर’ मध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटासाठी मुलांना बाल शक्षण तसेच आरोग्य व पोषण सहाय्य देण्यात येणार आहे. तर दुपारी महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योग विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातील.
3867 बालकांना मिळणार पोषण आहार
या 100 अंगणवाड्यांमध्ये एकूण 0 ते 6 वर्षाची 3 हजार 867 बालके व 602 गरोदर व स्तनदा मातांना लाभ मिळणार आहे. याचबरोबर 1134 किशोरी मुलींना दुपारच्या सत्रात उद्योग पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास व महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्याने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा शासनाचा मानस आहे.
या उपक्रमा अंतर्गत अंगणवाड्यांची रंगरंगोटी, बालमैत्रीय सजावट, ई-लर्निंगसाठी LED टीव्ही/टॅबलेट यासह मूलभूत सुविधांचा समावेश आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी ई-लर्निंग व आरोग्यसेवांसाठी आशा वर्कर्स व ANM चे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.



