आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी
‘आभा’ ॲप प्रक्रियेमुळे महिला रुग्णालयात रुग्णांची गैरसोय; डॉ. अशोक नेते

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली येथील महिला रुग्णालयात ओपीडीची चिठ्ठी काढण्यासाठी ‘आभा (ABHA)’ ॲप अनिवार्य प्रक्रियेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः आदिवासीबहुल व दुर्गम भागातून येणाऱ्या नागरिकांना स्मार्टफोन, इंटरनेट किंवा ॲप वापरण्याचे पुरेसे ज्ञान नसल्याने तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे गर्भवती महिला, लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ओपीडी नोंदणीसाठी ‘आभा’ ॲपची प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ लागत असल्याने रुग्णालयात अनावश्यक गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वारावर माहितीपर फलक लावणे, स्वतंत्र मदत कक्ष सुरू करणे आणि कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना प्रत्यक्ष सहकार्य उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, बालरोग विभागाच्या कक्ष क्रमांक २९ मध्येही रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे पालकांनी सांगितले. काही पालकांच्या मते, डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे आजारी बालकांना अर्धा ते एक तास प्रतीक्षा करावी लागली, त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
याच दरम्यान कक्ष क्रमांक २९ समोर एका व्यक्तीशी संबंधित डॉक्टरांचा शाब्दिक वाद झाल्याचाही आरोप काही उपस्थितांनी केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.



