आपला जिल्हाताज्या घडामोडी

नगरसेवक हर्षल गेडाम यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करा- काँग्रेसची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

नगरपरिषद गडचिरोलीच्या प्रभाग क्रमांक २-अ चे नगरसेवक हर्षल दादाजी गेडाम यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे, तसेच यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, नगरपरिषद गडचिरोलीच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २-अ मधून हर्षल गेडाम हे सदस्य म्हणून निवडून आले होते. नामनिर्देशनपत्र दाखल करताना त्यांनी परधान अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पोचपावती सादर केली होती.

मात्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, गडचिरोलीने यापूर्वीच त्यांचा गोंड अनुसूचित जमातीचा दावा वैध ठरविलेला असल्याने त्यानंतर सादर करण्यात आलेले परधान अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा सहयुक्त, नगरपालिका प्रशासन यांनी ९ जून २०२६ रोजी मुख्याधिकारी, नगरपरिषद गडचिरोली यांना लेखी आदेश देऊन हर्षल गेडाम यांचे सदस्यत्व भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आदेश जारी होऊनही आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

विश्वजीत कोवासे यांनी म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखी आदेशाची अंमलबजावणी न होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे कायदेशीर प्रक्रियेचा आणि शासनाच्या आदेशाचा अवमान होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आवश्यक असल्यास संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाहीही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यासोबतच हर्षल दादाजी गेडाम यांचे नगरपरिषद सदस्यत्व तात्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणात न्याय्य व त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, श्रीकांत देशमुख, पराग पोरेड्डीवार, नंदू कायरकर तसेच परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker