ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘राम आणि दानपेटीही सुरक्षित नाही; त्याचे श्रेय भाजपने घ्यावे’ – आ. अंबादास दानवे
गडचिरोलीत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात मोर्चाची घोषणा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देशभर सुरू असलेल्या ‘श्रीराम रक्षा आंदोलन’ च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. “आज प्रभू श्रीराम आणि दानपेटीही सुरक्षित नाही. त्याचे श्रेय भाजपने घ्यावे,” अशी टीका त्यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे होणाऱ्या श्रीराम रक्षा आंदोलनाला विदर्भातून मोठा प्रतिसाद मिळावा, यासाठी खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे विदर्भ दौऱ्यावर असून, त्याच अनुषंगाने ते गडचिरोली येथे आले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नावरही सरकारवर निशाणा साधला. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील विकास आणि वन्यजीवांच्या वाढत्या समस्यांवर आवाज उठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
गडचिरोलीतील वन्यजीवांच्या प्रश्नाला प्राधान्याने हाताळले जाईल, असे सांगत दानवे म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी आता आपल्या हक्कांसाठी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे.
“नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोलीचा अपेक्षित विकास झालेला नाही. या जिल्ह्याचा केवळ सत्ते साठी वापर करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला.



