आरमोरी, प्रतिनिधी :
आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीत आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शुभम नामदेव रामटेके (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा आपल्या मित्रांसोबत वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. मित्रांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
शुभम हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीण असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे वडील कबाड (जुन्या वस्तू खरेदी-विक्री) व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलाला शिक्षण देत अभियंता बनवले होते. दोन महिन्यांपूर्वीच शुभमला एका कंपनीत नोकरी मिळाली होती. कुटुंबाच्या आशा-अपेक्षांचा आधार असलेला मुलगा अचानक निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नदीकाठी सुरक्षेच्या उपाययोजनांची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Back to top button