आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

रब्बी हंगामातील शेतमाल खरेदीसाठी तातडीने शासकीय केंद्र सुरू करा

काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील रब्बी हंगामातील मका व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करून आवश्यक गोदामांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधांच्या आधारे रब्बी हंगामात मका व धान पिकांचे उत्पादन घेत आहेत. दरवर्षी शासनामार्फत शेतमाल खरेदीसाठी केंद्रे सुरू केली जात असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता. मात्र, यावर्षी पावसाळा तोंडावर आला असतानाही पुरेशा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उन्हाळी हंगामात जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मका व धानाचे उत्पादन झाले आहे. मात्र, विक्रीसाठी शासकीय व्यवस्था उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतेच आंदोलन करून खरेदी केंद्र सुरू न झाल्यास धानाची होळी करण्याचा इशारा दिला आहे. तर गडचिरोली तालुक्यातील अनेक शेतकरी मका व धान विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रांवर वारंवार चकरा मारत असल्याची परिस्थिती आहे.

शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत ॲड. कोवासे यांनी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असून शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागणार आहेत. पेरणीपूर्वी खते, बियाणे आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना निधीची आवश्यकता असते. अशा वेळी शेतमाल विक्री न झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत.

शेतकरी आंदोलन करत असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हा काँग्रेस कमिटी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दिला आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker