आपला जिल्हाताज्या घडामोडी

सृजनरंग’ उन्हाळी कला शिबिराचा उत्साहात समारोप

गडचिरोली,प्रतिनिधी :-

‘निर्मितीपर्व’ एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर फाउंडेशन, गडचिरोली, द्वारा संचालित ‘विंग्स’ क्रिएटिव्ह आर्ट अकॅडमी आणि वैशाली स्टुडिओ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३० दिवसीय ‘सृजनरंग’ उन्हाळी कला शिबिर २०२६ चा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

वसंत विद्यालय, गडचिरोली येथे २ मे ते ३० मे या कालावधीत आयोजित शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी चित्रकला व हस्तकलेशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत अनेक आकर्षक कलाकृती साकारल्या. तसेच विविध सृजनशील उपक्रमांमधून कौशल्यांचा विकास साधत आनंददायी अनुभव घेतला. या महिनाभर चाललेल्या शिबिरात सर्व कला साहित्य आयोजक संस्थेकडून देण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुचिता कामडी या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाभारत न्यूज चे संपादक,सामाजिक कार्यकर्ते श्री. उदय धकाते तसेच जेष्ठ शिक्षक सतीश धाईत सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभा गावतुरे, आणि राकेश हेडाऊ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या शिबिरात विद्यार्थ्यांना कला प्रशिक्षण प्रख्यात चित्रकार अनिल बारसागडे यांनी दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला, हस्तकला आणि विविध सर्जनशील कला प्रकारांचे मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये मुलांनी कला शिक्षणासोबतच विविध मनोरंजक उपक्रमांचा आनंद घेत धम्माल मजाही केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात कामडी मॅडम म्हणाल्या की

“आज ‘सृजनरंग’ उन्हाळी कला शिबिर २०२६ च्या समारोप समारंभाच्या प्रसंगी आपल्यासमोर अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या ३० दिवसांमध्ये या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केवळ चित्रकला शिकली नाही, तर आपल्या कल्पनाशक्तीला रंग दिले, सर्जनशीलतेला वाव दिला आणि आत्मविश्वासाने स्वतःची कला व्यक्त करण्याचे कौशल्य आत्मसात केले. ब्लो पेंटिंग, थ्रेड पेंटिंग, थंब प्रिंटिंग, पर्णचित्र, मंडला आर्ट, वारली आर्ट, मधुबनी आर्ट, अॅब्स्ट्रॅक्ट आर्ट, टॅटू आर्ट, जलरंग तंत्र, कॅनव्हास पेंटिंग, ओरिगामी, पेपर-कार्डबोर्ड क्राफ्ट, हाऊस मेकिंग अशा विविध कलाप्रकारांमधून विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा खुलवली दिसते आहे. कला ही केवळ रंग आणि रेषांची मांडणी नसते, तर ती व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असते. कला मुलांना संयम, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी, संवेदनशीलता आणि नवकल्पनांची प्रेरणा देते. आज या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि त्यांच्या कलाकृतींमधून दिसणारा आत्मविश्वास हीच या उपक्रमाची खरी यशोगाथा आहे.

या यशस्वी शिबिराचे आयोजन करणाऱ्या ‘निर्मितीपर्व’ एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर फाउंडेशन, गडचिरोली, ‘विंग्स’ क्रिएटिव्ह आर्ट अकॅडमी आणि वैशाली स्टुडिओ, गडचिरोली यांच्या संयुक्त प्रयत्नांचे मी मनःपूर्वक कौतुक करते. विद्यार्थ्यांमध्ये कलागुण विकसित करण्यासाठी त्यांनी घेतलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे.”

या कला उपक्रमाचे संचालक अनिल बारसागडे आपल्या आभार प्रदर्शनात मुख्याध्यापकांचे, शाळेच्या व्यवस्थापनाचे, सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व पालकांचे तसेच या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करताना म्हणाले की, “मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हीच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची मोठी गुंतवणूक आहे. आज शिबिराचा समारोप होत असला तरी तुमची कलायात्रा येथे थांबू नये. या शिबिरातून मिळालेला आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिकण्याची जिज्ञासा कायम जपून ठेवा. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हातातील रंग उद्याचे सुंदर भविष्य घडवू शकतात. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. भविष्यातही असेच सर्जनशील आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित होत राहोत, हीच सदिच्छा व्यक्त करतो.”

उदय धकाते यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या कलाकृती बघून त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. त्यांनी मार्गदर्शन केले की, “उन्हाळी कला शिबिर हे मुलांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कला मुलांना त्यांच्यात एकाग्रता, संयम आणि सौंदर्यदृष्टीही विकसित करते. आजच्या डिजिटल युगात मुलांना सकारात्मक आणि सृजनशील उपक्रमांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कला शिबिरे करतात. त्यामुळे अशा शिबिरांची आवश्यकता काळाची गरज बनली आहे.” 

उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपापली मनोगते सादर केली.

याप्रसंगी सर्वांना सहभाग प्रमाणपत्रांच्या वितरणासोबतच बक्षीस वितरण तसेच आर्ट पार्टीचे आयोजन देखील संपन्न झाले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारे असे उपक्रम भविष्यातही नियमितपणे आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी तथा पालकांनी व्यक्त केली.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker