आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी
जागतिक सायकल दिनानिमित्त ३ जून रोजी गडचिरोलीत सायकल रॅली
पर्यावरण संवर्धन व आरोग्य जनजागृतीसाठी सायकल स्नेही मंडळाचा उपक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने बुधवार, ३ जून २०२६ रोजी शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सदर सायकल रॅली सकाळी ६ वाजता इंदिरा चौक, गडचिरोली येथून सुरू होणार असून कारगिल चौक, आयटीआय चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, आयटीआय चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे वसंत विद्यालय, गडचिरोली येथे सकाळी ७.३० वाजता समारोप होणार आहे.
या रॅलीमध्ये गडचिरोली शहरातील नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी तसेच सायकलप्रेमींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“सायकल चालवा, आरोग्यवान व्हा”, “प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा” आणि “इंधन बचतीसाठी सायकल हा उत्तम पर्याय” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वाढते प्रदूषण, इंधनाचे वाढते दर आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता सायकलचा वापर वाढणे ही काळाची गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
सायकल स्नेही मंडळाचे संस्थापक बंढोपंत बोढेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. विलास पारखी, सरचिटणीस उदय धकाते, उपाध्यक्ष उपेंद्र रोहनकर, महिला उपाध्यक्षा प्रा. सुनीता साळवे, सहसचिव योगिता देशमुख, संघटक प्रा. अरुण पालारपवार, सदस्य सुचिता कामडी, मीरा चौधरी, सुचिता धकाते, नीलिमा देशमुख, विजय साळवे, प्रा. वासुदेव तडसे, चंद्रकांत लेनगुरे, विलास निंबोरकर तसेच विद्यार्थी प्रमुख मोहित देशमुख यांनी सर्व नागरिकांनी या रॅलीत सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.
“सायकल चालवा, पर्यावरण वाचवा”
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलप्रेमींची जनजागृती फेरी
आरोग्य आणि पर्यावरणासाठी गडचिरोलीत सायकल रॅलीचे आयोजन



