गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील चार महिन्यांपासून मानधन अदा करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आरोग्य सेवा अखंडितपणे सुरू ठेवल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या १६ मे २०२३ रोजीच्या पदभरती जाहिरातीनुसार अंतिम गुणवत्तेत निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे १० फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात आले होते.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात सदर भरती प्रक्रियेतील ५० टक्के जागा राखीव ठेवून उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
मात्र शासन निर्णय होऊनही अद्याप कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यातच मागील चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाढते पेट्रोल दर, राहण्याचे भाडे आणि दुर्गम ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीत सेवा बजावताना मोठा आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत असल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली.
“अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही नागरिकांना आरोग्य सेवा प्रामाणिकपणे दिली. मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आम्ही बिनपगारी कामबंद आंदोलन करत आहोत,” अशी भावना आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
तसेच शासनाने तात्काळ निर्णय घेऊन मानधनावर कार्यरत सर्व बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे व थकीत मानधन त्वरित अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात मयुर कोडापे, निखिल उसेंडी, लोकेश मडावी, लंकेश तुलावी, सुजीतकुमार आतला यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button