आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोली शहराच्या पाणीप्रश्नी नगराध्यक्षांची तळमळ; गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी नगर परिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या गडचिरोली शहराला वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा केला जात असला तरी नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे शहरात अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी नागरिकांच्या अडचणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. शहरवासीयांना उन्हाळ्यात मूलभूत गरज असलेले पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेत नगराध्यक्षांनी दाखविलेली तळमळ आणि तत्परता यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.



