गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील महिलांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आरोग्य विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे एकाच दिवसात तब्बल २७ मातांवर ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक ट्युबल लिगेशन’ अर्थात दूरबीनद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.
गडचिरोली जिल्हा तसेच मुलचेरा तालुक्यात अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे हे पहिले मोठे यश मानले जात असून, आरोग्य सेवाक्षेत्रात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
या विशेष शस्त्रक्रिया मोहिमेचे नेतृत्व जिल्हा शल्यचिकित्सक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः सर्व २७ शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ चमूने ही मोहीम यशस्वी करून दाखविली.
या मोहिमेत डॉ. स्मिता साळवे यांनी सक्रिय सहभाग घेत शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. भूलतज्ज्ञ डॉ. समीर बनसोडे यांनी शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक भूलसेवा देत महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांचे समुपदेशन केले व त्यांना शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित केले. मुलचेरा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनीही या शिबिराच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला.
आधुनिक आणि सुरक्षित कुटुंब नियोजन पद्धती
‘सिंगल पंक्चर’ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही आधुनिक व सुरक्षित कुटुंब नियोजन पद्धती मानली जाते. या प्रक्रियेत पोटावर केवळ एक लहान छिद्र करून दूरबीनच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे रक्तस्त्राव अत्यल्प होतो, टाके पडत नाहीत, वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरे होऊन दैनंदिन जीवनात परतू शकतात.
दुर्गम आणि आदिवासी भागातील महिलांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
याबाबत डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, महिलांना सुरक्षित, प्रभावी आणि कमी त्रासदायक कुटुंब नियोजन सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुलचेरा येथे मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथील या यशस्वी उपक्रमानंतर आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक’ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरांचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक दुर्गम व आदिवासी भागातील महिलांपर्यंत ही अत्याधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button