आपला जिल्हाताज्या घडामोडी

५५० कोटींच्या कामांची चौकशी, ताळगुडा पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

कोटी–कोरणार पुलिया प्रकरणी बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

कोटी–कोरणार पुलिया दुर्घटना, गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ₹५५० कोटींच्या विविध कामांतील कथित अनियमितता तसेच एटापल्ली तालुक्यातील ताळगुडा पुलाची दयनीय अवस्था या प्रश्नांवर आजाद समाज पक्षाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मंत्र्यांनी संबंधित प्रकरणात जातीने लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोटी–कोरणार पुलिया २९ जुलै रोजी कोसळल्यानंतर आजाद समाज पक्षाने हा मुद्दा लावून धरला होता. मुख्यमंत्री यांना निवेदन, पत्रकार परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानंतर शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.

मात्र, एसआयटी चौकशी सुरू असतानाही संबंधित कंत्राटदारावर अद्याप ठोस कारवाई का करण्यात आलेली नाही, असा सवाल पक्षाने उपस्थित केला आहे. कंत्राटदाराला संरक्षण कोण देत आहे, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने मंत्र्यांकडे केली.

₹५५० कोटींच्या कामांचे ऑडिट करण्याची मागणी

गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ₹५५० कोटींच्या विविध कामांची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निविदा प्रक्रिया, कामांचे वाटप, डिझाइनमध्ये करण्यात आलेले बदल, वाढीव खर्च, कामांची गुणवत्ता, मोजमाप पुस्तिका आणि देयकांची प्रक्रिया यांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी पक्षाने केली आहे. विशिष्ट कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणात कामे देण्यात आल्याचा आरोप करत त्याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

ताळगुडा पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी

एटापल्ली तालुक्यातील गठ्ठा–गर्देवाडा मार्गावरील ताळगुडा पुलाची अवस्था चिंताजनक असल्याचा दावा करत या पुलाचे तातडीने Structural Audit आणि तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुलाची सुरक्षितता तपासून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका पक्षाने मांडली.

यावेळी आजाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, प्रतीक डांगे व सतीश दुर्गमवार उपस्थित होते. विनोद मडावी यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी कोटी–कोरणार पुलिया, ₹५५० कोटींची बांधकामे आणि ताळगुडा पुलाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.

“एसआयटी स्थापन झाली म्हणजे प्रश्न संपलेला नाही. चौकशीच्या नावाखाली दोषी अधिकारी किंवा कंत्राटदाराची पाठराखण होता कामा नये. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत आजाद समाज पक्षाचा पाठपुरावा सुरूच राहील,” असा इशारा विनोद मडावी यांनी दिला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker