गडचिरोली,प्रतिनिधी:-
अवैध गोवंश वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३२ गोवंशीय जनावरांसह दोन चारचाकी वाहने व तीन मोबाईल असा एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई २८ ऑगस्टच्या रात्री आरमोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठाणेगाव–आरमोरी टी-पॉइंट परिसरात करण्यात आली. पोलिसांना अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांनी सापळा रचला.
पोलिसांनी संशयास्पद आयसर वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये २६ गायी व ६ बैल, अशी एकूण ३२ जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच वाहनातील दोघांनी जंगलाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी प्रणय समीर जांभुळकर (२०, रा. आंधळी, ता. कुरखेडा) याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.
दरम्यान, या गोवंशाने भरलेल्या वाहनाच्या पुढे दोन वाहने पायलटिंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहनासह पसार झाला. त्यानंतर पाठीमागील स्विफ्ट डिझायर वाहनातील तीन जणांनीही वाहन सोडून जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेहबाज सलाम शेख (३१, गडचिरोली), शोहेब फारुक शेख (२७) व शेख आकिब नासीर शेख (दोघेही रा. जाफरनगर, नागपूर) तसेच प्रणय समीर जांभुळकर (२०, रा. आंधळी, ता. कुरखेडा) यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या चौकशीत पळून गेलेल्या क्रेटा वाहनातील शहजाद शेख (रा. कुरखेडा) आणि जमील कुरेशी (रा. गेवर्धा) यांच्या सांगण्यावरून आयसर वाहनाची पायलटिंग करत असल्याची माहिती अटक आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहा जनावरे मृतावस्थेत
जप्त करण्यात आलेल्या ३२ गोवंशीय जनावरांची वैद्यकीय तपासणी केली असता ४ गायी व २ बैल, अशी सहा जनावरे मृतावस्थेत आढळून आली. उर्वरित जनावरांना पुढील नियमानुसार सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपी शहजाद शेख, जमील कुरेशी तसेच आयसर वाहनाच्या अज्ञात चालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कांबळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज. जी. व सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि आरमोरीचे पोलीस निरीक्षक सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
Back to top button