आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षण

राज्यातील शाळांमध्ये आता वर्षातून चार वेळा ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’

पालकांचा शाळेतील सहभाग वाढविण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गडचिरोली, प्रतिनिधी :-

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि ‘निपुण भारत’ अभियानाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ वर्षातून चार वेळा आयोजित करण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तालयाने दिले आहेत. नव्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम व्यापक सामाजिक चळवळीच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

शाळा आणि पालक यांच्यात नियमित संवाद व समन्वय निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांपर्यंत पोहोचविणे, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग वाढविणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.

शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल महिन्यातील पहिल्या शनिवारी माता-पालक शैक्षणिक मेळावे घेण्यात येणार आहेत. हे मेळावे शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळास्तरावर आयोजित केले जाणार आहेत.

पालकांशी थेट संवादावर भर

मेळाव्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती, वर्तन, अध्ययनातील अडचणी, वाचनाची सवय, घरातील शैक्षणिक वातावरण आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. पालकांना शासकीय शैक्षणिक योजनांची माहिती देतानाच त्यांच्या सूचना, अडचणी आणि अपेक्षाही जाणून घेतल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषण, सुरक्षितता, बाल हक्क तसेच शाळेतील विविध उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचा उपक्रम

मेळाव्याच्या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरातील परिस्थिती व शैक्षणिक अडचणी समजण्यास मदत होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाययोजना करता येतील. पालकांचा शाळेवरील विश्वास आणि सहभाग वाढण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नियमितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

मेळाव्यात ‘रोज २० मिनिटे मुलांसोबत’ या उपक्रमातून पालकांनी मुलांशी अभ्यास, वाचन, गोष्टी, कविता, गणिती उपक्रम, आरोग्यदायी सवयी आणि आवडीनिवडी यावर संवाद साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांनी या मेळाव्याचे प्रभावी नियोजन करून पालकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker