आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
गावागावात ‘प्रतिसरपंच’ नेमणार!
१,६८८ गावांपर्यंत संघटन पोहोचविण्याचा आजाद समाज पार्टीचा निर्धार

गडचिरोली, प्रतिनिधी :-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीने गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी ‘गावागावात प्रतिसरपंच’ ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायती आणि १,६८८ गावांपर्यंत पक्षाचे संघटन पोहोचवून शेवटच्या गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी बैठकीत या संघटनात्मक उपक्रमाची घोषणा करण्यात आली. ‘प्रतिसरपंच’ हा केवळ पक्षाचा पदाधिकारी न राहता गावातील नागरिकांच्या प्रश्नांचा आवाज बनून प्रशासनाकडे त्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
गावातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शासकीय योजनांचा लाभ तसेच ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता यासंदर्भातील प्रश्नांची माहिती घेऊन ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी प्रतिसरपंचांवर सोपविण्यात येणार आहे.
तरुण-तरुणींना नेतृत्वाची संधी
ग्रामपातळीवर सक्रिय असलेल्या आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या तरुण-तरुणींनी प्रतिसरपंच पदासाठी पक्षाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी केले. गावातील प्रश्नांवर संघर्ष करणारे स्थानिक नेतृत्व उभे करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून “प्रत्येक गावात संघटन, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन” या भूमिकेने काम करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.
दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर
नियुक्त होणाऱ्या प्रतिसरपंचांना सामाजिक व राजकीय कामाची दिशा देण्यासाठी लवकरच दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात येणार असून, ग्रामपातळीवरील प्रश्नांचा अभ्यास, प्रशासनाशी संवाद आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनाची भूमिका याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
“सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांचे राजकारण गावागावात पोहोचवायचे आहे. जिल्ह्यातील १,६८८ गावांपर्यंत संघटन पोहोचवून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष उभा केला जाईल. आगामी काळात गावातील जनता आणि तरुणाई हीच पक्षाची ताकद असेल,” असा विश्वास राज बन्सोड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बैठकीत काही नागरिकांनी पक्षात प्रवेश केला असून, त्यांच्या क्षमतेनुसार आगामी काळात संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.




