आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी
नाजुका राऊत माता-बाळ मृत्यूप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा- आजाद समाज पार्टी

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील कथित हलगर्जीपणामुळे अवघ्या आठ दिवसांत पुन्हा एका माता व नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आजाद समाज पार्टीने प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. नाजुका राऊत यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, केवळ निलंबनाची कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली.
गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर नाजुका राऊत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नवजात बाळाचाही काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेतील आपत्कालीन उपचार, रक्ताची उपलब्धता आणि प्रसूतीनंतरच्या उपचार व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘निलंबन ही अंतिम कारवाई नव्हे’
“दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई करून प्रकरण मिटवण्याचा प्रकार आता बंद झाला पाहिजे. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी राज बन्सोड यांनी केली.
निलंबनानंतर काही महिन्यांनी संबंधित अधिकारी पुन्हा सेवेत येत असतील, तर प्रशासनातील हलगर्जीपणाला आळा कसा बसेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींची किंमत सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना जीव गमावून मोजावी लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘आमदारांनी केवळ बैठका आणि प्रसिद्धीपुरते मर्यादित राहू नये’
गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेबाबत वारंवार गंभीर घटना समोर येत असताना लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले आहे. “गोरगरीब जनतेचे जीव जात असतील, तर लोकप्रतिनिधींनी केवळ प्रसिद्धी, फोटो आणि रीलपुरते मर्यादित न राहता आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत,” अशी टीका आजाद समाज पार्टीने केली.
चामोर्शी येथील जिजा सातर यांच्या मृत्यूच्या घटनेनंतरही आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर चर्चा झाली होती. तातडीने उपाययोजना करण्याऐवजी बैठक आणि आश्वासनांपुरते प्रशासन मर्यादित राहिले आणि त्यानंतर आठवडाभरातच नाजुका राऊत यांच्या मृत्यूची घटना घडल्याचा आरोप पक्षाने केला.
‘व्यवस्था सुधारली नाही तर राजीनाम्याची मागणी करू’
“आरोग्य व्यवस्था सुधारली नाही, दोषींवर फौजदारी कारवाई झाली नाही आणि जनतेच्या जीवाशी खेळ सुरूच राहिला, तर संबंधित आमदारांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन रस्त्यावर उतरू,” असा इशारा राज बन्सोड यांनी दिला.



