आपला जिल्हाताज्या घडामोडीसाहित्यिक

ग्रामीण प्रश्न, पर्यावरण आणि लोकाभिमुख पत्रकारितेला प्राधान्य देण्याचे उदय धकाते यांचे आवाहन

दैनिक ‘चंद्रधून’च्या गडचिरोली आवृत्तीचा दिमाखदार शुभारंभ

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातून गेल्या २५ वर्षांपासून प्रकाशित होत असलेल्या दैनिक ‘चंद्रधून’च्या गडचिरोली जिल्हा आवृत्तीचा शुभारंभ मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या आवृत्तीचे पत्रकारिता क्षेत्रातून स्वागत करण्यात आले.

दैनिक ‘हितवाद’चे जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्या हस्ते गडचिरोली आवृत्तीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रेस क्लब गडचिरोलीचे अध्यक्ष तथा दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद उमरे, नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार उदय धकाते, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वर्षा मनवर, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जगात भारतीय पत्रकारचा दर्जा घसरला – रोहिदास राऊत 

अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांनी म्हटले कि,आज आपल्या भारतीय पत्रकार चा दर्जा घसरल्यामुळं नेपाळ मध्ये गेलेल्या पत्रकारांना सत्य बातमी दाखवा. असे तेथील नागरिक म्हणतात या वरून पत्रकारांनी निपक्ष भूमिका निभावावी चंद्रधुन च्या माध्यमातून लोकांच्या समस्या ला न्याय मिळावं. चंद्रधुन च्या टीम मध्ये असलेले सर्व संपदकीय टीम चे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

‘चंद्रधून’ने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे : उदय धकाते

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उदय धकाते यांनी दैनिक ‘चंद्रधून’ला शुभेच्छा देताना पत्रकारितेतील बदलत्या परिस्थितीवर परखड भाष्य केले.

उदय धकाते म्हणाले, “वेंकटेश दुड्डमवार यांचे कडून मला चंद्रधूनची गडचिरोली आवृत्ती सुरू होत असल्याची माहिती मिळाली, तेव्हा सुरुवातीला मला वाटले की नवीन पेपर सुरू होत आहे. मात्र, मुख्य संपादक पुरुषोत्तम चौधरी सरांनी हा तोच चंद्रधून असून तो पुढे चालविण्याची जबाबदारी घेतल्याचे स्पष्ट केले. वृत्तपत्र म्हटले की मालकी हक्काची भावना असते. मात्र, मालकांनी संपादकाला वृत्तपत्र पुढे नेण्याची जबाबदारी देणे ही मोठी आणि कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी पत्रकारितेचे खरे महत्त्व ओळखून ही जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.”

गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातून एखाद्या वृत्तपत्राची स्वतंत्र जिल्हा आवृत्ती सुरू होणे ही महत्त्वाची उपलब्धी असल्याचे सांगून ते म्हणाले की, “गडचिरोलीतून सुरू झालेला हा श्रीगणेशा पुढे नागपूर आवृत्तीपर्यंत जावा, अशी अपेक्षा आहे.”

‘चंद्रधून’ या नावाचा संदर्भ देताना उदय धकाते यांनी अत्यंत मार्मिकपणे सांगितले, “चंद्र जसा जगाच्या कोणत्याही भागात पोहोचतो, त्याचप्रमाणे चंद्रधूनच्या बातम्याही ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील समस्या वृत्तपत्रात सातत्याने यायला हव्यात. चंद्रधून वाढवायचा असेल तर ग्रामीण वाचकांवर विशेष भर द्यावा लागेल.”

एआयच्या युगात प्रत्यक्ष पत्रकारितेचे महत्त्व वाढले

सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातील पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना उदय धकाते म्हणाले, “आज एआयचा जमाना आला आहे. एआयमध्ये खूप रेटिंग मिळते; पण कुठेतरी आपली बुद्धी क्षीण होण्याचा धोका आहे. पत्रकारांनी एआयपासून काही प्रमाणात दूर राहून प्रत्यक्ष वास्तव शोधण्यावर भर दिला पाहिजे.”

आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाची आठवण सांगताना त्यांनी सांगितले की, “१९९५ मध्ये गडचिरोली पत्रिकेसाठी झाडांच्या कत्तलीवर माझी पहिली बातमी होती. त्यापासून पर्यावरण हा माझ्या पत्रकारितेतील महत्त्वाचा विषय राहिला आहे.”

गडचिरोलीत औद्योगिकीकरण वाढत असताना पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी अधिक वाढली आहे. कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात किती झाडे जगली, त्यांची देखभाल होते का, याचा शोध घेणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. “दावे कितीही मोठे असले तरी त्यामागची वस्तुस्थिती शोधणे आणि ती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे काम आहे,” असे उदय धकाते यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक नागरिक हा बातमीचा स्रोत-

डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना उदय धकाते म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यात पोर्टलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्या देऊन वाचकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. प्रिंट मीडियाचा प्रभाव आजही मोठा आहे. पोर्टलवरील बातमी कधी डिलीट होईल किंवा प्रायव्हेट होईल हे सांगता येत नाही; मात्र वृत्तपत्रातील बातमीची नोंद कायम राहते.”

पत्रकारांनी समाजातील प्रत्येक घटकाकडे लक्ष देण्याचे आवाहन करताना उदय धकाते म्हणाले, “प्रत्येक माणूस हा बातमी देणारा असतो. रस्त्याने जाणाऱ्या सामान्य व्यक्तीलाही एखादी समस्या असते आणि तिथेच बातमी तयार होते. पत्रकारांनी अशा व्यक्तींना हेरले पाहिजे आणि त्यांच्या समस्या योग्य पद्धतीने मांडल्या पाहिजेत.”

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, पत्रकार मिलिंद उमरे,वर्षा मनवर, यांची समयोचित भाषने झालीत.

लोकाभिमुख पत्रकारितेचा संकल्प:-

कार्यक्रमाच्या प्रारंभी दैनिक ‘चंद्रधून’चे मुख्य संपादक पुरुषोत्तम चौधरी यांनी प्रास्ताविकातून वृत्तपत्राची भूमिका, पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी आणि बदलत्या माध्यमविश्वात विश्वासार्ह पत्रकारितेचे महत्त्व विशद केले. गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण जिल्ह्यात स्थानिक प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम माध्यमाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक ‘चंद्रधून’चे कार्यकारी संपादक देवनाथ गंडाटे यांनी गडचिरोली आवृत्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, विकासकामे, प्रशासन, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, आदिवासी समाजाचे प्रश्न तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला.

वरिष्ठ संपादक सुरेशजी तावडे यांनी प्रभावीपणे कार्यक्रमाचे संचालन केले. गेल्या २५ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वाचकांचा विश्वास संपादन केलेल्या दैनिक ‘चंद्रधून’ने आता गडचिरोली जिल्ह्यात पाऊल ठेवले असून, विश्वासार्ह, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत सकारात्मक योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती:-

कार्यक्रमाला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरूनुले, बालकल्याण समितीचे देवगडे, सदस्य दिनेश बोरकुटे, शासकीय मुलांचे निरीक्षण गृह गडचिरोलीचे अधीक्षक महेश रणदिवे,पत्रकार जयंत निमगडे, अनिल बोदलकर, संदीप कांबळे मंगल पेटकर, नरेश निकुरे, प्रकाशजी सुरजागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच दैनिक ‘चंद्रधून’चे गडचिरोली आवृत्तीप्रमुख व्यंकटेश दुड्डमवार, जिल्हा प्रतिनिधी नसीब जांभुळकर, कार्यालय प्रतिनिधी डिंपल सहारे यांच्यासह नेहा भोयर, नंदा कोलते, सरस्वती पाल, सविता रोडे, तेजस्विनी आडबले आणि शुभम चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी दैनिक ‘चंद्रधून’च्या गडचिरोली आवृत्तीला शुभेच्छा दिल्या.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker