गडचिरोली, प्रतिनिधी :-
हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या ५० माओवादी सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी हिंसाचाराला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या प्रभावी अभियानासोबतच शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणालाही यश मिळत आहे. आतापर्यंत एकूण ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आत्मसमर्पणानंतर संबंधित सदस्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार आर्थिक सहाय्य, शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभ देण्यात येत आहेत.
‘प्रोजेक्ट संजीवनी’तून आत्मविश्वासाला बळ
गडचिरोली पोलिसांच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ च्या माध्यमातून केवळ प्रशासकीय पुनर्वसन न करता आत्मसमर्पित सदस्यांना नव्याने आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी देण्यावर भर देण्यात येत आहे.
आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘ऑपरेशन रोशनी’अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे, आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, ध्यान व योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक पुनर्वसनाचा भाग म्हणून आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह लावून देण्यात आले आहेत.
तसेच ८८ आत्मसमर्पित माओवाद्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आत्मनिर्भर होऊन सन्मानाने जीवन जगावे – एम. रमेश
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांना मार्गदर्शन करताना कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगून समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जावे. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आत्मसमर्पणानंतर पोलीस दलाकडून वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक धानोरा सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक भामरागड सागर भामरे आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Back to top button