गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरातील ज्वेलरी दुकान बंद करून घरी जात असलेल्या सराफ व्यावसायिकाला अडवून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील चोरी व जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची तत्परता दिसून आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सुरेश बाबूराव भोजापूरे (वय ५०), व्यवसाय—ऐश्वर्या ज्वेलरी शॉप, गडचिरोली, यांनी तक्रार दाखल केली. रात्री दुकान बंद करून मोटारसायकलवरून सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घरी जात असताना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील जंगल सोसायटीसमोर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने अडविले. आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकून त्यांच्याकडील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रारदाराने आरडाओरड केल्याने आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस ठाण्यात अप. क्र. 1231/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 309(5), 62 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गडचिरोली शहरातील विशाल घनश्याम देशमुख (वय ३६, रा. रामनगर), राकेश विजय गिरसावळे (वय ३५, रा. कननवार नगर) आणि शहबाज सलाम शेख (वय ३१, रा. विवेकानंद नगर) या तिघांना ताब्यात घेतले.
पोलिस चौकशीत सोनू खांडेकर (वय २४, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली) याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे आरोपींनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, गडचिरोली पोलिस ठाणे, करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधेरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज जी., सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण तसेच विविध पोलिस पथकांनी कारवाईत सहभाग घेतला.
“गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दल सातत्याने प्रयत्नशील राहील,” असे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले.
Back to top button