चामोर्शी, प्रतिनिधी :-
चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बससेवेच्या विविध समस्यांची आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या चामोर्शी जनसंपर्क कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी बससेवा नियमित व सुरळीत उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी एसटी महामंडळाकडे केली.
चामोर्शी तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बससेवेच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नुकतेच चामोर्शी बसस्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन केले होते. पोलीस विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनाची दखल गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी घेतली. त्यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी चामोर्शी येथील आमदार जनसंपर्क कार्यालय कक्ष क्रमांक २ येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांनी बसच्या वेळापत्रकातील अनियमितता, ग्रामीण मार्गांवरील बसफेऱ्या आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अन्य अडचणींबाबत आपल्या समस्या मांडल्या. डॉ. खुणे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
यानंतर एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक तसेच गडचिरोली आगार व्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्यांची माहिती देण्यात आली. तसेच महामंडळाकडून प्राप्त झालेल्या बसच्या वेळापत्रकाबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
“चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नियमित आणि वेळेवर बससेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत प्रश्न आहे. एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारींचे तात्काळ निरसन करून आवश्यक त्या बसफेऱ्या सुरू कराव्यात. विद्यार्थ्यांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पोहोचवून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल,” असे डॉ. प्रणय खुणे यांनी सांगितले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्येची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची व्यवस्था केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, मानवाधिकार संघटनेचे नेते भीमराव वनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आसुटकर, कार्यालय प्रमुख विनोद किरमे, मनीषा बोधनवार, किशोर कुंडू, पलाश घरामी, तारक हलदार तसेच चामोर्शी शहरातील शिक्षक, शिक्षिका आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
Back to top button