गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी नागरिकांची झोप उडाली. दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे समोर आले आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यातील अहेरी शहरासह नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली.
पहाटेच्या सुमारास अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही.
प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष
भूकंपाच्या धक्क्यांची माहिती मिळताच जिल्हा व तालुका प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. संबंधित यंत्रणांकडून संभाव्य नुकसानीची माहिती घेतली जात असून, सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
दरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना घाबरून न जाता शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असून नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा, चुकीची माहिती अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी आवश्यक ती दक्षता बाळगावी, असेही जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले आहे.
Back to top button