आपला जिल्हाताज्या घडामोडीशिक्षणसामाजीक
शिक्षक वडिलांच्या स्मृतींना लेखणीची मानवंदना; ३५० विद्यार्थी व शिक्षकांना पेन भेट
शिक्षक दिनी आगळावेगळा उपक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शिक्षक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील जिल्हा परिषद (माध्यमिक शाळा) हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शनिवारी आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम पार पडला. आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मृती जपत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी शिक्षकांच्या मुलांनी एकत्र येत शाळेतील सुमारे ३५० विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्येकी तीन पेन भेट दिले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गडचिरोली शहरातील जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या या शाळेत शिक्षण घेऊन याच शाळेत शिक्षक म्हणून आदर्श सेवा बजावलेल्या स्व. बी. डी. धकाते, स्व. मनोहरराव कोपुलवार, स्व. संभाजी होकम, स्व. प्रभाकरराव रोटकर आणि स्व. देवराव नगराळे यांच्या मुलांनी शिक्षक दिन आपल्या वडिलांच्या स्मृतींना समर्पित केला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची संकल्पना शासकीय माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा गव्हर्नमेंट हायस्कूल अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष उदय धकाते यांनी मांडली. शिक्षक दिनानिमित्त आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या मुलांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना लेखणी भेट देण्याचा उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्याला संबंधित शिक्षकांच्या मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून हा उपक्रम प्रत्यक्षात साकारला.
शाळेच्या इतिहासाचा घेतला आढावा

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उदय धकाते यांनी जिल्हा परिषद हायस्कूलच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगत या शाळेने घडविलेल्या अनेक पिढ्यांचा गौरवपूर्ण प्रवास मांडला. आमचे सर्वांचे वडील याच शाळेत विद्यार्थी म्हणून शिकले आणि पुढे याच शाळेत शिक्षक म्हणून सेवा स्वीकारून असंख्य विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले, असे त्यांनी सांगितले.
या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत असून काही माजी विद्यार्थ्यांनी परदेशातही उच्च पदांवर सेवा बजावत शाळेचे नाव मोठे केले आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा आणि गुरुजनांचा अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
“पुस्तकी ज्ञानाला पर्याय नाही”
विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान अधिकाधिक आत्मसात करावे, असा सल्ला देताना धकाते म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर करताना त्यातून चांगले विचार, ज्ञान आणि सकारात्मक माहिती घ्यावी. गैरसमज पसरविणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या पोस्ट पुढे पाठविण्याऐवजी त्या डिलीट कराव्यात.
आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) जमाना आहे. मात्र, AI चा वापर करताना स्वतःची बुद्धी, विचारशक्ती आणि ज्ञान कमी होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर आपले स्वतःचे ज्ञान नष्ट करू नका; स्वतः विचार करा, वाचा आणि शिकत राहा,” असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिक्षक दिनानिमित्त उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही उदय धकाते यांनी सांगितले.
यावेळी माजी विद्यार्थी जितेंद्र मनोहर कोपुलवार, उमेश प्रभाकर रोटकर, विश्राम संभाजी होकम, शोभाताई नगराळे-निरंजने, सुरेखा न्यालेवार-घुमारे, समीर कडीवाल, निलेश दंडवते, सेवानिवृत्त शिक्षक अरुण पोगळे, प्राचार्य एकनाथ टेकाम, सहाय्यक शिक्षक श्री. बेलखोडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. सपना देशमुख यांनी केले.
“वडिलांनी दिले ज्ञानाचे संस्कार; त्यांच्या स्मृतींना लेखणीची मानवंदना”
शिक्षकांच्या स्मृती केवळ आठवणीत न ठेवता त्यांच्या कार्याचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच त्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देणारा हा उपक्रम शिक्षक दिनाच्या निमित्ताने विशेष ठरला. गुरुजनांच्या स्मृतींना यापेक्षा सुंदर मानवंदना काय असू शकते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




