जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूविक्री सुरू असल्याच्या तक्रारी होत असतानाच, पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. दारूविक्रीच्या ठिकाणी एक पोलीस अंमलदार नोटांचे बंडल स्वीकारताना आणि काही व्यक्तींशी चर्चा करताना या चित्रफितीत दिसत असल्याने प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
४ सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चित्रफीत गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा टोली येथील असून ती ऑक्टोबर २०२५ मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
चित्रफितीत चार-पाच व्यक्तींच्या उपस्थितीत एक पोलीस अंमलदार बसलेला दिसतो. त्याच्या हातात नोटांचे बंडल असल्याचे चित्रफितीत दिसून येते. संबंधित व्यक्तींशी सुरू असलेल्या संभाषणात काही दारूविक्रेत्यांना कारवाईपासून वाचविण्याचा संदर्भ असल्याचे ऐकू येते. ‘पाच लोकांना ॲडजस्ट करतो’, तसेच अडचण निर्माण झाल्यास थेट संपर्क साधण्याचा सल्ला दिल्याचेही चित्रफितीत ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.
‘दणादण दारू विकायची’?
चित्रफितीत दारूविक्रीशी संबंधित एका व्यक्तीकडून ‘आता दणादण दारू विकायची, भ्यायचं कोणालाच नाही’, अशा आशयाचे वक्तव्य केले जात असल्याचे दिसते. त्यामुळे कथित व्यवहारामागे नेमके काय घडले, तसेच संबंधित व्यक्ती आणि पोलीस अंमलदार यांच्यातील संभाषणाचा संदर्भ काय होता, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या चित्रफितीमुळे दारूबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील काही घटक आणि अवैध दारूविक्रेत्यांमध्ये संगनमत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, व्हिडिओची सत्यता, त्यातील संभाषणाचा संपूर्ण संदर्भ आणि पैशांच्या कथित व्यवहाराचे स्वरूप तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
पाच जणांच्या नावांची चर्चा
दरम्यान, चित्रफितीत पाच अधिकारी-अंमलदारांची नावे घेतली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी दोघांची आंतरजिल्हा बदली झाल्याचे, तर एक जण सेवानिवृत्त झाल्याचे सांगण्यात येते. आणखी एक अंमलदार सध्या गडचिरोली पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गडचिरोलीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चौकशीनंतर कारवाईचे संकेत
व्हिडिओची पडताळणी करून संबंधितांची भूमिका तपासली जाणार असून, गैरवर्तन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.