गडचिरोली, प्रतिनिधी : –
आदिवासीबहुल आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील २४ विद्यार्थी सध्या ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असून, आता चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया १३ ते २० जूनदरम्यान राबविण्यात येणार आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. प्रादेशिक विकासासाठी शिक्षण आणि मानवी संसाधनांमध्ये गुंतवणूक आवश्यक असल्याच्या भूमिकेतून गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाची अंमलबजावणी कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) विभागांतर्गत कार्यरत असलेल्या लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनमार्फत केली जात आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कापासून ते राहणीमानाच्या खर्चापर्यंत संपूर्ण आर्थिक जबाबदारी फाउंडेशनकडून उचलली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
फाउंडेशनकडून प्रत्येक विद्यार्थ्यावर दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च केला जात असून संपूर्ण अभ्यासक्रमासाठी प्रति विद्यार्थी अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यात येत आहे. आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संधी मिळाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांत या योजनेच्या तीन बॅचेसना लाभ मिळाला असून अनेक विद्यार्थ्यांनी परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत असल्याने जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून गडचिरोलीतील युवकांना नवे क्षितिज खुलं करून देण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button