गडचिरोली, प्रतिनिधी :-
माडे तुकूमसह आंबेटोला व महादवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी पुरवठा योजनांच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांवर अखेर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. सदर योजनेसाठी कंत्राट घेतलेल्या कु. दिपाली भाष्कर शेंडे (रा. दोनाडा, ता. सावली, जि. चंद्रपूर) या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयास सादर करण्यात आला आहे.
या संदर्भातील आदेश ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी २८ ऑगस्ट २०२५ रोजी काढला असून, यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्या आढावा बैठकींमध्ये व सुनावणींमध्ये या प्रकरणात वारंवार निर्देश देण्यात आले होते.
ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर २६ ऑगस्ट रोजी महाभारत न्यूज मध्ये “माडे तुकूम जलजीवन मिशनची पाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू” ही बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध ही कठोर कारवाई केली आहे.
गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थ शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले होते. आता या कारवाईमुळे भविष्यातील योजना वेळेत व गुणवत्तापूर्ण रित्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय बोबाटे यांच्यासह ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करून हा विषय मांडला होता. अखेर प्रशासनाने या प्रकरणात ठोस पावले उचलल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button