आपला जिल्हा

गडचिरोली पोलीस दलाने वाचविले मातेचे प्राण

गडचिरोली, प्रतिनिधी :-

पोलीस दलाच्या हेलीकॉप्टरच्या सहाय्याने दुर्मिळ बी-निगेटिव्ह रक्तगटाची पिशवी तात्काळ पोहचविण्यात आल्याने मातेला मिळाले नवीन जीवन मिळवून देण्यास गडचिरोली पोलीस यशस्वी ठरले.

सविस्तर वृत्त असे आहे की, मागील तीन दिवसांपासून जिल्ह्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्रातील अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्याचा व तालुक्यातील इतर गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशातच दिनांक 08 सप्टेंबर 2024 रोजी एका महिलेची ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे प्रसुती झाली होती. प्रसुती दरम्यान खुप रक्तस्त्राव झाल्यामुळे मातेला रक्ताची गरज भासली. परंतु पुरामुळे ग्रामीण रुग्णालय भामरागड इथपर्यंत रक्ताचा पुरवठा करणे शक्य होत नाही, याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील डॉ. भूषण चौधरी यांनी उप.वि.पो.अधि. भामरागड अमर मोहिते यांना कळविली. त्यावरुन उप.वि.पो.अधि. भामरागड अमर मोहिते यांनी सदरच्या परिस्थितीबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना माहिती दिली. सोबतच वरिष्ठ स्तरावरुन जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. माधुरी विके (किलनाके) यांनी हेलीकॉप्टरच्या सहाय्याने रक्तपुरवठा करणे शक्य आहे किंवा नाही याबाबत पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचेशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी, गडचिरोली व जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली यांचेशी समन्वय साधुन आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या हेलीकॉप्टरच्या सहाय्याने विनाविलंब गडचिरोली येथील जिल्हा सामाण्य रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बी-निगेटिव्ह अशा दुर्मिळ रक्तगटाची एक पिशवी अहेरी येथुन ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे पाठविण्यात आली.

अधिक माहिती अशी की, सौ. मानतोश्री गजेंद्र चौधरी, वय 24 वर्षे, रा. आरेवाडा तह. भामरागड जि. गडचिरोली असे महिलेचे नाव असुन दिनांक 08 सप्टेंबर 2024 रोजी प्रसववेदला जाणवू लागल्याने तिस ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले होते.

दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी सुरक्षित प्रसुती झाली व तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. परंतू, प्रसुतीदरम्यान रक्तस्त्राव अधिक झाल्याने तिची प्रकृती खालावली होती. त्यामुळे तिला तात्काळ रक्त चढविणे आवश्यक होते. ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे उपलब्ध असलेली बी-निगेटिव्ह रक्ताची एक पिशवी मानतोश्रीला चढविण्यात आलेली होती. परंतू, तिच्या प्रकृतीत पुर्णपणे सुधारणा होण्यासाठी आणखी एका पिशवीची आवश्यकता होती. अशावेळी बाहेर सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झालेली असतांना तसेच खराब हवामानामुळे हेलीकॉप्टरने रक्तपिशवी ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे पोहचविणे कठीण झाले होते.

अखेर आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेताच पोलीस दलाच्या हेलीकॉप्टरने तात्काळ रक्तपिशवी भामरागड येथे पोहचविण्यात आली. सध्या माता मानतोश्री व बाळाची प्रकृती स्थिर असून माता व बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.