गडचिरोली, प्रतिनिधी :-
आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य तणावाचा परिणाम आता गडचिरोलीतील एका कुटुंबावर झाला आहे. शहरातील मुख्य चौकातील ‘हॉटेल रसिका’चे संचालक सुनील बुरेवार यांचे कुटुंब पर्यटनासाठी दुबईला गेले असताना आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्याने ते तेथेच अडकून पडले आहेत. मायदेशी सुखरूप परतण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुनील बुरेवार, त्यांच्या पत्नी मेघा बुरेवार, बहीण मयुरा बुरेवार तसेच नील बुरेवार हे २५ फेब्रुवारी रोजी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. नियोजित कार्यक्रमानुसार ५ मार्च २०२६ रोजी इंडिगोच्या ‘6E 1466’ या विमानाने दुबई–हैदराबाद–नागपूर असा त्यांचा परतीचा प्रवास ठरलेला होता. मात्र मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.
सध्या हे कुटुंब दुबईतील ‘Avari Deira’ हॉटेलमध्ये थांबले असून परिस्थितीबाबत ते चिंतेत आहेत. “आम्ही सध्या सुरक्षित आहोत; मात्र उड्डाणे रद्द होणे आणि सतत येणाऱ्या युद्धाच्या बातम्यांमुळे भविष्यासंदर्भात भीती निर्माण झाली आहे,” असा संदेश नील बुरेवार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. त्यांनी आपल्या मुक्कामाचा पत्ता व प्रवासाचा तपशील देत केंद्र व राज्य शासनाने हस्तक्षेप करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या प्रकरणाची दखल घेत राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाशी तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुबईतील भारतीय दूतावासामार्फत आवश्यक ती मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बुरेवार कुटुंबाच्या सुखरूप परतीसाठी गडचिरोलीकरांचे लक्ष आता प्रशासकीय हालचालींकडे लागले आहे.
Back to top button