गडचिरोली,प्रतिनिधी :-
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “संपूर्ण कर्जमाफी” व “सातबारा कोरा” करण्याचे शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही, अशी गंभीर टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केली आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना गाजावाजा करून दिलेली आश्वासने आज केवळ घोषणाच ठरल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, विदर्भात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, गेल्या दोन वर्षांत राज्यात ६१२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ५० टक्के म्हणजे जवळपास ३००० आत्महत्या विदर्भातील आहेत.
“शेतकरी, महिला, गोरगरीब यांच्याशी सरकारने निवडणूकपूर्वी दिलेले आश्वासन हे केवळ फसवणूक होती. आज राज्यात भाजपा सत्तेवर असूनही कोणतेच आश्वासन पूर्ण झालेले नाही. हे जनतेशी केलेले धोकेबाजपण आहे.” – अनिल देशमुख
धान खरेदी व बोनस वितरणावर टीका
राज्य सरकारने धान खरेदीसाठी योग्य नियोजन केलेले नाही. सरकारने बोनसची घोषणा करताना प्रति हेक्टर २० हजार रुपये देण्याचे स्पष्ट नमूद केले होते. मात्र, प्रत्यक्षात केंद्रावर धान विकलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान दिले जात आहे. अनेक पात्र शेतकऱ्यांना बोनस मिळालाच नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. सरकारने आपल्या आदेशालाच केराची टोपली दाखविली आहे, असा आरोप त्यांनी केला.
खतांचा तुटवडा आणि कंपनी लिंकींगचा फटका
धानासाठी आवश्यक असलेल्या डि.ए.पी. व युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त असून खत विक्रीसह अन्य वस्तू जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. खत कंपन्या लिंकींगचा गैरवापर करीत असताना कृषी विभाग केवळ वितरण केंद्रांवर कारवाई करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
‘लाडकी बहिण’ योजनेचे राजकारण
देशमुख म्हणाले की, भाजप सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना सुरू करून सुरुवातीला १५०० रुपये दिले. प्रचार सभांमध्ये २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. पण निवडणुकीनंतर ९ महिने उलटले तरीही २१०० रुपये देण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे राज्यात १४,००० पुरुषांनी या योजनेचा गैरवापर केल्याचेही समोर आले आहे.
कंत्राटदारांचे थकीत बिले, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
राज्यातील कंत्राटदारांचे मागील वर्षभरापासूनचे बिले थकीत असून, विकासकामे ठप्प झाली आहेत. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराने राज्य पोखरले आहे. सत्ताधारी आमदार व मंत्र्यांकडून गुंडगिरी खुलेआम सुरू असून सामान्य जनतेला न्याय मिळत नसल्याचे देशमुख म्हणाले.
पत्रकार परिषद मध्ये माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, राका अध्यक्ष गण्यारपवार, माजी अध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार,भाग्यश्री आत्राम आदी उपस्थित होते.
Back to top button