गडचिरोली, प्रतिनिधी :-
विमानतळ आणि औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळजबरीने अधिग्रहित करू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मौजा हिरापूर, गुरवडा, राखी परिसरातील शेतजमिनी विमानतळासाठी प्रस्तावित करून सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांना पूर्वसूचना अथवा ग्रामपंचायतीला माहिती न देता जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका किसान काँग्रेसने मांडली. जिल्ह्यात रोजगाराची पुरेशी साधने नसल्याने शेतजमीन हीच शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा, मुदलीसह १२ ते १४ गावांतील सुपीक जमीन एमआयडीसीसाठी घेण्यासही विरोध करण्यात आला. औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये, अशी मागणी करण्यात आली.
धानाला चार हजारांचा हमीभाव, हेक्टरी ५० हजार बोनस
खते, बियाणे, औषधे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे धान शेती परवडत नसल्याचे सांगत धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये हमीभाव आणि प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये रोख बोनस देण्याची मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी विकलेल्या धानाची रक्कम सात दिवसांत त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली.
२४ तास वीज आणि वन्यप्राण्यांपासून संरक्षण द्या
शेतीपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. वाघ आणि रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती नुकसानीपोटी हेक्टरी ४० हजार रुपये मदत देण्यात यावी. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ६० लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे, जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दीपक वाढई, दृष्टांत किरसान, धर्माजी बगमारे, भास्कर बांडे, भास्कर दोनाडकर, महादेव पत्रे, प्रयेश दर्वे, बळीराम दर्वे, जिल्हा काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष अब्दुल भाई पंजवानी, दिलीप मेश्राम, मनोज अग्रवाल, किशोर वानखेडे, मिलिंद खोब्रागडे, पांडुरंग पेशने आदी उपस्थित होते.
Back to top button